स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र पुणे

स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र पुणे

ब्रिटिशांच्या विरोधात बंड करून, ज्या ठिकाणी स्वातंत्रवीरांनी विदेशी कपड्यांची होळी केली व स्वदेशीचा मंत्र दिला; त्या संघर्षाची, राष्ट्रभक्तीची स्मृती जागवणारे ऐतिहासिक स्थळ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र. पुणे शहरात डेक्कन भागात, कर्वे रस्त्यावर हे स्मारक आहे. पुणे मनपा व विवेक व्यासपीठ संचालित स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र म्हणजे शहरातील वैचारिक व राष्ट्रीय विचारांच्या प्रबोधनाचे सक्रीय केंद्र झालेले आहे. स्वा. सावरकर म्हणजे प्रखर देशभक्ती, बुद्धिवादी राष्ट्रीय विचार; त्याचसोबत अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन! स्वा. सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग सर्व सर्वश्रुतच आहे. त्याचबरोबर, त्यांनी उभे केलेले सामाजिक आंदोलन, सामाजिक प्रबोधन हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. विवेक व्यासपीठ संचलित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रा’चा उद्देश हा सावरकरांचे अलौकिक कार्य व विचार भावी पिढी समोर यावे, हा तर आहेच; त्यासोबत विज्ञानाधिष्ठित व विवेकवादी समाज निर्माण करणे, हा देखील आहे. यासाठी अध्यासन केंद्र विविध उपक्रमांद्वारे कार्यरत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राचे उपक्रम

प्रेरणादायी इतिहासाचे जागरण : स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीपर्वची आठवण करून देणारे हे ऐतिहासिक स्थळ आहे. युवा सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी याच स्थळी १९०७ साली विदेशी कपड्यांची होळी पेटवली होती. पुणे मनपाने निर्माण केलेल्या या स्मारकाचे उदघाटन ऑक्टोबर 2003 साली झाले व नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते डिसेंबर 2016 मध्ये झाले. या ठिकाणी विदेशी कापडाच्या होळीची भव्य शिल्पाकृती उभारण्यात आलेली आहे. या ठिकाणी घडलेल्या घटनेचा इतिहास भिंतीवर कोरण्यात आलेला आहे. याच ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा छानसा अर्धपुतळा आहे आणि लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे यांची शिल्पे बसविण्यात आली आहे. भिंतीवर कोरलेला इतिहास वाचताना स्वातंत्र्याच्या क्रांतीयज्ञाची, प्रेरणादायी स्वातंत्र्यलढ्याची माहिती मिळते.

संदर्भ ग्रंथालय : स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष श्री. प्रदिपदादा रावत यांच्या कल्पनेतून व सहकार्याने या अध्यासन केंद्रात विशेषतः वैचारिक व भारतातील सामाजिक, राजकीय समस्या-वाद विषयक ग्रंथाचे संपन्न असे ग्रंथालय उभारले आहे. या ग्रंथालयाचे उद्घाटन लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी 23 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध विचारवंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या शुभहस्ते झाले. सावरकरांचे समग्र साहित्य, तसेच इतिहास व विविध वैचारिक विषयांवरील इंग्रजी, हिंदी व मराठी भाषांतील ग्रंथ या संदर्भ ग्रंथालयात उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचा उपयोग अभ्यासकांनी वाचन, अभ्यास व संशोधनासाठी करावा, असा प्रयत्न आहे. हे ग्रंथालय नि:शुल्क असून अभ्यासकांना अभ्यासाला बसण्यासाठी उत्तम व्यवस्था याठिकाणी उपलब्ध केली आहे

साहित्य विक्री केंद्र : स्वा. सावरकर लिखित समग्र साहित्याचे विक्री केंद्र या ठिकाणी आहे. यामध्ये सावरकरांचे सर्व साहित्य, सावरकरांवर अन्य लेखकांनी लिहिलेले ग्रंथ, काही दृक्-श्राव्य साहित्यही विक्रीसाठी उपलब्ध आहे

चित्रप्रदर्शनी : स्मारकाला लागूनच अध्यासन केंद्राची वास्तू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन व कार्यवर आधारित सुंदर व प्रेरणादायी अशी चित्रप्रदर्शने अध्यासनाच्या मुख्य सभागृहात सर्वांना बघता येईल, अशा पद्धतीने लावण्यात आलेली आहे.

माहितीपट : विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील ब्रिटिशांच्या दडपशाहीने, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारांचे कार्य आणि याच काळात स्वा. सावरकरांनी या ठिकाणी पेटविली विदेशी कापडाची होळी च्या इतिहासावर आधारित १६ मिनिटांच्या उत्कृष्ट माहितीपटाची निर्मिती पुणे मनपाने केलेली आहे. पर्यटक, नागरिक व विद्यार्थी यांना हा चित्रपट नि:शुल्क दाखवण्याची उत्तम व्यवस्था मुख्य सभागृहात केली आहे. या सभागृहात सातत्याने विविध वैचारिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात सुरुवातीला सदर माहितीपट दाखवला जातो. पुण्यातील विविध शाळांचे विद्यार्थी स्मारकास भेट देतात त्यांनाही माहितीपट टाकला जातो.

अद्ययावत सभागृह : स्वा. सावरकर अध्यासन केंद्रातील मुख्य सभागृह मोठे आणि वातानुकूलित आहे. सुमारे २०० ते २५० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या क्षमतेचे हे सभागृह (गॅलरीसह) आहे. याच सभागृहात चित्र प्रदर्शने आणि माहितीपट दाखविण्याची व्यवस्था केलेली आहे. हे सभागृह माफक शुल्क आकारून विविध कार्यक्रमांना (व्याख्यान, पुस्तक प्रकाशन, प्रशिक्षण, बैठका इ.) उपलब्ध करून देण्यात येते.

कार्यक्रम उपक्रम : अध्यासन केंद्राच्या सभागृहात सातत्याने विविध वैचारिक – प्रबोधनात्मक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, ग्रंथप्रदर्शन, महापुरूषांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी अनेक अभ्यासकांची व्याख्याने संपन्न झालेली आहेत. जसे प्राध्यापक शेषराव मोरे, श्री प्रदिपदादा रावत, प्रा. संतोष शेलार, प्रा. बालाजी चिरडे, प्रा. राजीव साने, श्री. पांडुरंग बलकवडे, श्री. सुब्रमण्यम स्वामी, श्री. सुनील देवधर, श्री. दिलीप करंबेळकर, श्री. रमेश पतंगे, प्रा. सदानंद मोरे, प्रा. संजय तांबट, ले. जनरल राजेंद्र निंभोरकर ही यादी खूप मोठी आहे. आज एकप्रकारे अध्यासन केंद्र हे पुणे शहरात राष्ट्रीय विचारांचे, विषयांचे प्रबोधन करणारे सक्रीय केंद्र झालेले आहे. 2018-19 या वर्षात अभिनेते योगेश सोमण यांचे उत्तम सादरीकरण असलेला “मी विनायक दामोदर सावरकर” या नाट्यप्रयोगाचे कार्यक्रम महिन्याला प्रत्येक महिन्याला नि:शुक्ल आयोजित केले गेले. यास पुणे शहरातून सावरकरप्रेमींचा भरघोस प्रतिसाद मिळाला. तसेच अपर्णा चोथे यांचा अभिनय असलेला नाट्यप्रयोग “त्या तिघी – स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा” सावरकर घराण्यातील विरांगनांच्या शौर्यगाथेवर आधारित या नाट्यप्रयोगाचे ही अनेक कार्यक्रम संपन्न झाले. येथे होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती, प्रसिद्धी, तसेच सावरकरी विचारांचे जागरण व्हावे याकरिता अध्यासन केंद्राचे फेसबुक पेज आहे, ट्विटर, इंस्टाग्राम, अकाउंट तसेच यु-ट्यूब चॅनल सुद्धा आहे. अध्यासन केंद्रात झालेल्या अनेक व्याख्यानांचे व्हिडिओज या यु-ट्यूब चॅनल आपणास पाहायला मिळतील.

समारोप : भविष्यात या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका उभारणे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दिशादर्शक विचारांच्या अनुषंगाने “राष्ट्रीय सुरक्षेच्या” संदर्भात संशोधन व लिखाणास चालना मिळेल असे केंद्र उभे राहावे असा प्रयत्न आहे. अध्यासन केंद्राचे अध्यक्ष पुण्याचे माजी खासदार श्री. प्रदिपदादा रावत आहेट. तर कार्यवाह म्हणून श्री. महेश पोहनेरकर कार्यरत आहेत. विश्वस्त मंडळात मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ विचारवंत, लेखक श्री शेषराव मोरे, अभ्यासक श्री. पांडुरंग बलकवडे आणि श्रीनिवास कुलकर्णी आहेत, श्री. धनंजय काळे उपाध्यक्ष आहेत. कोषाध्यक्ष म्हणून श्री. प्रल्हाद राठी आहेत. सावरकरांच्या बुद्धिवादी, हिंदुत्ववादी विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी अध्यासन केंद्र अनेक कार्यक्रम उपक्रमांद्वारे सक्रिय आहे. पुणे शहरातील अनेक समविचारी संस्था, संघटना व व्यक्ती अध्यासन केंद्राची जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या सहकार्याने अध्यासन केंद्राची वाटचाल सुरू आहे.

» Click here for YouTube Channel